Thursday, December 3, 2009

"नंग्या तलवारीची अथांग रात्र"

'' त्रुतु बदलतो ,
दुपारच्या उन्हात फ़क्त खारिंची हालचाल...
अनामिक भुताच्या छायेत आणखी एक भयाण रात्र जाते,
एक कोकीळ आणि एक बुलबुल अखंड गात राहतात..
तुम्ही स्वतःलाच सांगता " काही नाही हा एक साधा दिवस आहे,तो ही निघून जाईल"...


कुठल्याशा झाडाच्या वाळलेल्या फांदीवर उमललेल्या
नविन गुलाबी केशरी अंकुराकडे तुम्ही आश्चर्याने पाहता ,
आपली पोकळ पाने पसरून एक काटेरी झुडूपही उभं असतं...
त्याची लाल मखमली पाने काटेरी पलंगावर विसावली असतात;
आणि अचानक तुमच्या यातनांच्या गावातून रक्त वाहतं ...
बेढब आच्छादालेल आपल आयुष्य तिथेच थांबत ...
धुराचे स्तंभ सैतानी आगीसकट आकाशाला स्पर्श करतात ....


तुम्ही जे घेऊ शकता ते घ्या,
वस्तू..
नरकाचे अवशेष..
तुमच्या नसलेल्या गोष्टींनी तुमची झोळी भरून घ्या;
त्या वस्तूंना स्मृतींशी जोडा..
आणि कसे ? कसे आपण या लुटी सोबत जगणार आहोत ?
याची पूर्ती विनाशात होणार आहे.


आपण का म्हणून भ्यायचं ?
तलवार,भाले,बंदुकांचे आवाज,माणसांच्या पावलांची धावपळ,तुम्ही शेवटची कधी ऐकली होती ?
आयुष्याचे पुस्तक पायाखाली तुडवण्याचा आवाज तुम्ही ऐकला होता?
काय तलवार आणि भाल्यांना स्वताःच आवाज असतो ?
तुम्ही ऐकलं होतं त्यांना,जवळ येताना ?
दहा,शंभर,हजारो...
विजयाच्या जल्लोषात का पराभवाच्या आक्रोशात ?
मृत्यु आणि हानी चे आक्रोश ...
का फ़क्त रडणं होतं ते ?
तीक्ष्ण दगडांवरून आणि फुटलेल्या काचांवरून जड़ पावलांनी अलगद जाणं होतं ते .


कळपातील प्राण्यांचे प्रतिबंध आम्ही मोडले...
पंखांशिवाय फडफडताहेत पक्षी,
तुम्हाला किती मिळाले ?
घरी घेउन जा त्यांना, दोन किंवा वीस...
उलटे लटकवा,पाय बांधा, लोंबकळणाऱ्या स्थितीत.
रक्ताने माखलेल्या हातांनी त्यांचे तुकडे करा आणि पिसांच्या ढगांनी ,केसांच्या, खुरांच्या कानांच्या झुबक्यांनी आणि गुदमरलेल्या किंचाळीने आसमंत भरून टाका...
मंद आचेवर निवांत शिजवा; रात्र मोठी आहे,
तलवारी अजुन नंग्याच आहेत...


आवडती नक्षीदार साड़ी ,धूळीत चुरगळते,राख होते..
कोपरया कोपऱ्यात मन भरकटते,जाण अजाण ठिकाणांतुन...
आणि एक अश्रू धुराची नळकांडी तुमच्या पायाशी येऊन पड़ते...
तुम्हाला मृत्युच्या भीतीने ग्रासून टाकते,
चेहरा काचेसारखा तडकतो,
बंदुकीच्या गोळीसारखं ठळक काहीतरी आवाज करत वेगानं जातं,
का अँसिडची बाटली होती ती ?
पेट्रोलचा कँन ?
पेटवलेली काडी ?
अश्रुंनी डोळ्यांना दंश केलेला तुम्हाला जाणवतो ?


आगीच्या कारंज्याप्रमाणे पेटायला तयार, तुमचं रक्त पेट्रोल प्रमाणे भासतं.
गंध म्हणजे काय तुम्ही विसरलाय...
गंध आयुष्याचा,
गंध प्रेमाचा..
घरं भट्टीसारखी जळतात आणि सिलेंडर फटाक्यांसारखे फुटतात,
तुम्ही विचार करता कोणत्या बेकरीत तुम्ही शेवटचा ताज्या भाजलेल्या पावाचा वास घेतला होता ?
कधी फुलांचा सुवास घेतला होता ?
शेवटचे कधी तुम्ही निर्भयपणे चालला होता ?
कधी विचार केला होता तुम्ही मृत्यूचा,आपत्तिचा, अंत्यवीधिचा ?


शहरातील ओळखीच्या गल्लीतून मन फिरत राहतं,
कधी हे घेत तर ते सोडून देत ...
राखेच्या ढीगारयापासून लांब जातं आणि स्वतःशीच विचार करतं,
काय अर्थ आहे स्वातंत्र्याचा ?
सौंदर्य म्हणजे काय?
घर म्हणजे ??
मृत्यूच्या छायेत बंदुकीच्या धाकाने रिकाम्या गल्लीतून नीरव शांतता फडफडत राहते भेदरलेल्या पक्षासारखी ..."


- लेखक : कौस्तुभ म. कुलकर्णी
संपर्क : 09420455688
स्वैरअनुवाद ( लॉन्ग नाईट ऑफ़ अन्शीथ स्वार्ड- एस्थेर डेविड)

1 comment: